Tuesday, August 31, 2010

formula for success

हमखास यशाचा फॉर्मुला



देवाने आपणा सर्वांना जवळ जवळ समान शारिरीक क्षमता दिलेल्या आहेत, समान बौध्दीक क्षमता सुध्दा दिलेल्या आहेत. म्हणजेच आपल्या सर्वांचं हार्डवेअर जवळ जवळ सारखच आहे परंतु प्रश्न आहे तो फक्त त्यात इंस्टॉल करण्यात आलेल्या सॉफ्ट्वेअरचा. तो बरोबर आहे की चुकीचा? जर सॉफ्टवेअर इंस्टॉल करायचा असेल तर आपण आधी यशस्वी लोकांच्या डोक्यात इंस्टॉल केलेल्या सॉफ्टवेअर बद्दलच आधी माहीती करुन घेतलेले बरे. त्याच सॉफ्टवेअरचा जर आपण सुध्दा वापर केला तर आपण त्यांनी मिळविलेल्या यशाची पुनरावृत्ती करु शकतो.
मी स्वत:ला सतत एक प्रश्न विचारला, तो म्हणजे 'हमखास यश मिळवण्यासाठी कुठला फॉर्मुला आहे का?' ' यशस्वी माणसे कुठला समान मार्ग वापरतात ज्यातुन त्यांना जे पाहीजे ते मिळते?'
बर्‍याच आदर्श व्यक्तीमत्वांचा अभ्यास, पुस्तके, प्रशिक्षण व मुलाखती इ. मधून माझ्या असे लक्षात आले की, जरी यशस्वी माणसे वेगवेगळ्या क्षेत्रातील असतील असली, त्यांची ध्येयं व साध्य करण्याचे आराखडे देखील वेगवेगळे असले तरी त्यांच्यामध्ये काहीतरी समान आहेच; आणि ते असे: सर्व यशस्वी माणसे त्यांना जे पाहीजे आहे ते मिळवण्यासाठी एका विशिष्ट क्रमामध्ये विशेष अशी पाऊलं उचलतात. मी या पाऊलांच्या क्रमाला हमखास यशाचा फॉर्मुला असं म्हणतो.
→ पहीली पायरी: तुमचे ध्येय स्पष्ट करा. तुम्हाला पाहीजे ते मिळविण्यासाठी, पहीली पायरी म्हणजे तुम्हाला नेमकं काय पाहीजे आहे ते माहीती असणे. परंतु बर्‍याच लोकांना त्यांना जे पाहीजे ते मिळत नाही कारण त्यांना नेमकं काय पाहिजे आहे हेच त्यांना माहीती नसते. बरेच लोक म्हणतात कि त्यांना यशस्वी व्हायचं आहे, पण त्यांना जर विचारलत की म्हणजे नेमकं काय? तर बर्‍याच जणांचं उत्तर असतं "नक्की काय ते माहीत नाही" किंवा त्यांचं काहीतरी ढोबळ उत्तर असतं "मला सुखी व्हायचं आहे", "मला खुप पैसा कमवायचा आहे", "मला माझ्या सर्व अडचणींवर मात करायची आहे", वगैरे वगैरे.
आपल्याला लक्षात ठेवलं पाहीजे कि जो पर्यंत आपल्याला आपले ध्येयंच माहीत नाही तो पर्यंत आपल्याकडील क्षमतेचा, वेळेचा व इतर साधन सामुग्रीचा वापर कसा करावा हेच आपल्याला कळणार नाही. यशस्वी माणसांचा हा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म असतो असे मला प्रकर्षाने जाणवले. त्यांना नेमकं काय पाहीजे आहे, भविष्याबद्दलची त्यांची संकल्पना त्यांच्या मनामध्ये स्पष्टपणे कोरली गेलेली असते. त्यांची ध्येयं निश्चित व नेमकी असतात आणि म्हणूनच त्या दिशेने ते प्रयत्न करतात. सचिन तेंडुलकरला त्याच्या लहानपणापासून एकच माहीत होतं 'मला भारतासाठी क्रिकेट खेळायचं आहे. बस्स.' भविष्याबद्दलचे त्याच्या मनातील चित्र हे स्पष्ट होते आणि म्हणूनच तो रात्रंदिवस फक्त एकच गोष्ट जगायचा ती म्हणजे 'क्रिकेट'. त्यामुळे तो आज भारताचा मास्टर ब्लास्टर आहे. याचप्रमाणे जर इतर यशस्वी माणसांचा अभ्यास केला तर हिच समान बाब जाणवते कि त्यांना त्यांची ध्येयं ही स्पष्ट होती.
आमच्या 'लक्ष्यवेध' प्रशिक्षणक्रमामध्ये, माझा हाच प्रयत्न असतो. लोकांना नेमके काय पाहीजे आहे याचे स्पष्ट चित्र त्यांना बघायला लावणे व ते नेमक्या शब्दात कागदावर मांडणे. आपल्या मेंदुला नेमक्या शब्दात सुचना मिळाल्या कि त्याची कार्यक्षमता कितीतरी पटीने वाढते.
 → दुसरी पायरी: ध्येयं साध्य करण्यासाठी आराखडा तयार करा जर आपल्याला आपली ध्येयंच स्पष्ट नसतील तर ती साध्य करण्यासाठी आराखडा कसा काय बनविणार? कंपनीचा टर्नओवर पाच करोड करण्यासाठीचा आराखडा व पन्नास करोड करण्यासाठीचा आराखडा हा वेगवेगळा असतो परंतु तो तेव्हाच आपण तयार करु शकतो जेव्हा आपल्याला आपलं ध्येयं स्पष्ट असेल. पण मग आराखडा बनविणे म्हणजे नेमकं काय? आराखडा बनविणे म्हणजेच तुमचे ध्येयं साध्य करण्यासठी कराव्या लागणार्‍या कृतींची क्रमवार मांडणी करणे.
उदाहरणार्थः जर तुम्हाला अंधेरी ते चर्चगेट प्रवास करायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी क्रमवार पणे कराव्याच लागतील. तुम्हाला आधी अंधेरी स्टेशनवर येउन तिकीट काढावं लागेल मग प्लॅट्फॉर्म वर जावं लागेल. ट्रेन पकडावी लागेल व चर्चगेट स्टेशनवर उतरावं लागेल. ह्या क्रमवार कृती तुम्हाला कराव्याच लागतील. तुमचे ध्येयं साध्य करण्यासाठी जो आराखडा बनवाल त्याचा क्रम खुप महत्त्वाचा आहे व आराखडा बनविण्याआधी योग्य संशोधन केले पाहीजे व मगच आराखडा तयार केला पाहीजे. आराखडा लेखी स्वरुपात कागदावर उतरवावा.
→ तिसरी पायरी: आराखड्याशी संलग्न कृती करा तिसरी पायरी म्हणजे आपले ध्येयं साध्य करण्यासाठी आपल्या आराखड्याशी संलग्न कृती करणे होय. हीच पायरी आपल्याला आपल्या ध्येयाच्या जवळ घेउन जाते. यशस्वी माणसे व फक्त स्वप्नं बघणार्‍यांमध्ये जर कुठला फरक असेल तर तो म्हणजे संलग्न 'कृती'. बर्‍याच सुशिक्षीत व हूशार माणसांना माहीत असते की आपणास काय केले पाहीजे, कसे केले पाहीजे पण ते कृती करतच नाहीत. ते म्हणतात ना, 'कळतं पण वळत नाही'.
आपल्याला खरोखरच जर आपले ध्येयं साध्य करायचे असेल तर कृती ही केलीच पाहीजे. तुम्हाला अशी व्यक्ती माहीत आहे का, जी तुमच्यापेक्षा कमी गुणवान आहे पण तुमच्यापेक्षा जास्त यशस्वी आहे? जर उत्तर हो असेल तर लक्षात घ्या, जरी तुम्ही त्या व्यक्तीपेक्षा जास्त हूशार असाल तरी त्या व्यक्तीने तुमच्यापेक्षा जास्तं कृतीवर भर दिला असणार. संलग्न कृती करण्यासाठी मानसिक व शारिरीकरित्या सक्षम असणे अत्यंत आवश्यक असते. आपल्या भावनांवर ताबा मिळवून, जोशात व आत्मविश्वासाने ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणं गरजेचं आहे.
 → चौथी पायरी: अपयशातुन शिका जेव्हा आपण आपल्या आराखड्यानुसार संलग्न कृती करतो तेव्हा फक्त दोन गोष्टी घडण्याची शक्यता असते. एकः तुम्ही ध्येयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करता किंवा ध्येय साध्य करता आणि दोन: तुम्हाला अपेक्षित परिणाम साध्य होत नाहीत, काहीतरी, अनपेक्षीत घडतं. आपल्यातील बरीच लोकं याला 'अपयश' असं म्हणतात! अपयशं सर्वांच्या आयुष्यात येतात का? हो अर्थातच. तुम्ही मला एक यशस्वी माणूस शोधुन दाखवा ज्याने कधी अपयश नाही अनुभवलं. उलट तुमचा जेवढा कृतीवर भर जास्त तेवढे अपयशाचे प्रमाण जास्त आणि म्हणुनच माझ्या संशोधनामध्ये मला असे आढळून आले की माणूस जेवढा यशस्वी, त्याच्या आयुष्यात अपयशाचे प्रमाण तेवढेच जास्त.
→ अपयशाला तोंड देण्याचे तीन पर्यायः
  पर्याय क्रमांक एक: कारण देणे, आरोप प्रत्यारोप करणे व सोडून देणे. काही माणसे अपयश मिळाले की इतर गोष्टींना कारणीभूत ठरवतात किंवा इतरांवर अपयशाचे खापर फोडतात. त्यांना वाटतं कि ध्येयं साध्य करणं त्यांच्यासाठी खूप कठीण आहे. ते निराश होतात व पुन्हा कृती करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. ते म्हणतात, "मी प्रयत्न केला व फसलो आता पुन्हा नाही!"

पर्याय क्रमांक दोन: त्याच कृतीची पुनरावृत्ती करणे. हि माणसे प्रयत्नशील माणसे असतात. अपयशानंतर सुध्दा गप्प बसत नाहीत व पुन्हा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं 'आपण जास्त कसोशीने प्रयत्न करुया, जास्त मेहनत करुया व आधी केलेली कृती पुन्हा करुया.' जर आपण एकाच कृतीची पुनरावृती केली व प्रत्येक वेळी वेगळा परीणाम अपेक्षीत केला तर तो निव्वळ मुर्खपणा ठरेल. जर आपण तेच केलं जे आधी केलं होतं तर आपल्याला तेच मिळेल जे आपल्याला आधी मिळालं होतं.

पर्याय क्रमांक तीन: शिका, आराखड्यात योग्य बदल करा आणि कृती करा. पर्याय जो सर्व यशस्वी माणसे वापरतात. जेव्हा ते आपले ध्येयं साध्य करीत नाहीत तेव्हा ते त्याला 'अपयश' मानत नाहीत. ते त्यातुन नवीन काहीतरी शिकतात कि त्यांनी तयार केलेला आराखडा परिणामकारक नव्हता, किंवा त्यांच्या कृतीमध्ये कुठेतरी कमतरता होती. नवीन शिकवण घेउन आपल्या आराखड्यामध्ये योग्य ते बदल करतात व पुन्हा कृती करतात.
जर पुन्हा ते यशस्वी नाही झाले तर त्यातुन ते पुन्हा नवीन काहीतरी शिकतात, आराखड्यात योग्य ते बदल करतात आणि त्याप्रमाणे कृती करतात असं ते तो पर्यंत करतात, जो पर्यंत त्यांचे ध्येयं साध्य होत नाही. ध्येय साध्य करण्यासाठी ते सर्व काही करतात.
मित्रांनो आपण हे लक्षात घेतले पाहीजे कि जेव्हा जेव्हा आपणास यश मिळत नाही तेव्हा तेव्हा आपल्याला त्यातुन नवीन काहीतरी शिकले पाहीजे. आपल्या प्रयत्नांमध्ये बदल केले पाहीजेत, जो पर्यंत आपले ध्येयं साध्य होत नाही तो पर्यंत! असं म्हटलं जातं की थॉमस एडिसनने वीजेच्या बल्बचा शोध लावण्यासठी एकूण १०,००० वेळा प्रयत्न केले. जेव्हा त्याला या बाबत विचारण्यात आलं तेव्हा त्याचं म्हणणं होतं की 'प्रत्येक अयशस्वी प्रयत्नानंतर मी माझ्या पध्द्तीमध्ये बदल केला व माझे ध्येयं साध्य झाले. पहील्या ९,९९९ प्रयत्नातुन मी बल्ब कसा बनविला जात नाही, हे शिकलो!'

मित्रांनो, तर हा होता 'हमखास यशाचा फॉर्मुला'. या फॉर्मुलातील चार पायर्‍या नक्कीच तुम्हाला जे पाहीजे आहे ते मिळ्वून देण्यास मदत करतील.
 → हमखास यशाचा फॉर्मुला: १. तुमचे ध्येयं स्पष्ट करा. २. ध्येयं साध्य करण्यासाठी आराखडा तयार करा. ३. आराखड्याशी संलग्न कृती करा. ४. अपयशातुन शिका

No comments:

Post a Comment